दिवाळी !
लहानपणापासून आम्हाला ह्या सणाचे खूप आकर्षण
! पहाटे उठा अभ्यंग स्नान करा जो उशिरा उठेल त्याला सरळ नरकात जागा ( अलबत्ता माझ्या
नरकात जाण्यावर शिक्कामोर्तब अनेक वेळा झाला आहे ) मग महत्वाचा भाग म्हणजे फटाके
फोडणे.पूर्व संध्येला बाजारातून आणलेल्या फटाक्यांचे विभाजन करायचे कोणता आधी?
कोणता नंतर? मोठे बॉम्ब किती फोडायचे? वैगरे वैगरे पण मोठा आवाज करणाऱ्या सुतळी
बॉम्ब पासून का कोण जाणे मला वैयक्तिक घृणा होती त्याचा समावेश मी क धी खरेदीत
केलाच नाही.प्रत्येक इयत्तेला फटाक्यांच्या अर्थसंकल्पामध्ये २०० रुपयांची वृद्धी
ठरलेली होती पण ८ वी पर्यंत फटक्यांनी प्रदूषण होत आणि ते आपल्याला पर्यावरणाला हानी
पोहचवते एवढी गोष्ट माझ्या बाल मनावर ठासली गेली आणि अर्थसंकल्पात कपात सुरु झाली
परंतु तोपर्यंत मामाच्या मुलांनी स्वायत्त निधीची मागणी लाऊन धरली.पण दिवाळी बद्दल
अध्यात्मिक आणि सांस्कृतिक बाबतीत नेहमी वाचणाऱ्या मला फटाक्यांच्या उगमाबद्दल
जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती कारण सण उत्सव हे आपल्या धर्मात फार पुरातन
काळापासून साजरे केलेलं जातात आणि मग फटाके=दिवाळी हे समीकरण कधी तयार झाले असावे अर्थातच
दारू गोळ्यांचा उपयोग भारतात परकीय आक्रामकांकडून प्रथम झाला मग हि सुरवात झाली
कशी ?
साधारणता आपल्या भारतात ज्यावेळी उत्तर
भारतात मौर्य वंशाची सत्ता होती त्यावेळी चीन मध्ये प्रथम फटाक्यांचा वापर करणात आला
असे म्हणतात बाम्बुमध्ये ज्वलनशील मिश्रण भरून त्याला तापवण्यात येत व त्यातून
मोठा आवाज होत असे आधी भूत पिशाच्च सैतान यांना दूर ठेवण्यासाठी ह्या फटाक्यांचा
उपयोग होत असे पण नंतर ही दारू (गन पावडर) युद्धामध्ये वापरण्यात आली.अरबांनी हि
कला मध्य आशियात नेली त्याला ते “चीनी अग्निबाण” म्हणत तिकडून सरळ ह्या कल्पनेचा
युरोपात प्रसार झाला १४ व्या – १५ व्या
शतकात अनुक्रमे बंदुकीचा आणि तोफांचा शोध लागला आणि रशियामध्ये १७ व्या शतकात
प्रथमच उत्सवाप्रसंगी आतिषबाजीसाठी फटाके वापरले गेले.काही जाणकारांच्या
म्हणण्यानुसार १२ व्या शतकात भारतात आतिषबाजी महोत्सव राज्यांतर्फे आयोजित केले
जाता असत.परंतु यासाठी ठोस असा काही पुरावा नाही.
मात्र मुघल,आदिलशहा,निजामशहा यांच्या काळात फटाक्यांचा वापर समारंभाप्रसंगी
केला जात असे तसे पाहता मुस्लीम शासकांकडून फटाके बनवण्याची कला प्रचलित करणायत
आली त्यानंतर पेशवाईमधेही फटाक्यांचा आणि आतेशबाजीचा उल्लेख बखरीत सापडतो.
परंतु फटाक्यांचा विकास भारतात हळू हळू झाला त्याला कारण म्हणजे आधीच्या काळात
ह्या वस्तू बनवण्यास प्रचंड खर्च येत असे जे फक्त चैनीसाठी खर्च करणाऱ्या राजांना,
निजामांना ,सावकारांना शक्य होत असे त्यामुळे सामान्य जनतेचा फटाक्यांशी संबंध आला
थेट १९ व्य शतकात ! भारतात प्रथम फटाक्यांचा कारखाना बंगाल मधेच उघडला गेला नंतर फटक्यांच्या
पुरवठ्यात दक्षिण भारताने बाजी मारली म्हणजे असे पाहता हिंदू धर्म आणि फटाके यांचा
संबंध १९५० नंतर दृढ झाला आणि तो इतका पक्का झाला कि फटाक्यांशिवाय सण म्हणजे पाण्याविणा
अन्नग्रहण जणू !
एका बाजूला आपण अभिमानाने सांगतो
कि हिंदू धर्माचे सगळे सण व उत्सव हे निसर्गपूरक आणि विज्ञानवादी असतात मग तो सण
दिवाळी असो गुडीपाडवा असो वा दसरा असो.असे पाहता ह्या गोष्टींमध्ये भरपूर अंशी
तथ्य आहे मग ते फटाक्यांच्या बाबतीत का लागू नाही ? हा प्रश्न माझ्या भाबड्या मनाला
कायम पडतो.सण-उत्सव समाजात सलोखा वाढवण्यासाठी,एकोपा निर्माण करण्यासाठी असतात हे
सर्वांना मान्य आहे.आता दिवाळीचाच मूळ उद्देश काय तर प्रकाशाच्या मदतीने अंधकार मिटवणे
मग ह्या प्रकाशाचा अर्थ कदाचित ज्ञान असू शकतो तर कधी कोणाला केलेली आर्थिक मदत असू
शकते.आपले आपले पैसे खर्च करण्याचा हक्क आणि सद्बुद्धी आपल्याकडे आहे हे मला ठाऊक
आहे पण भारताची राष्ट्रीय सवय आहे ती सल्ला देणे म्हणून आग्रह (वीज वाचवण्यासाठी
आकाशकंदील लाऊ नका असे मी सांगणार नाही) ! ठेवीले अनंते तैसेची रहावे ह्या
वृत्तीने आधीच आपले फार नुकसान झाले आहे त्यामुळे आता ज्या धर्माने मानवजातीच्या
उद्धाराचा आणि कल्याणाचा सदैव विचार केला तसे आचरणही केले त्या धर्माला अश्या
अनैसर्गिक आणि अशास्त्रीय चौकटीत बंधने कितपत योग्य ? सध्या आपल्याच धरणीमातेला आपल्या
सहाय्याची गरज आहे फटक्यांनी काय फरक पडतो एवढा प्रदूषणात असे म्हणणार्यांनी मागच्या
२० वर्षा पूर्वीचे तापमान , पूरस्थिती, वातावरण बदलाचे आकडे तपासावे आणि मग
सद्सद्विवेक बुद्धीला हाक मारून जागे करा.
न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान
करण्यासाठी काल न्यायालयाच्या आवारात फटाके फोडले गेले कारण अगदी उत्तम धर्मावर
घाला ! अहो जे चूक ते चूक म्हणा इतर धर्मात होत असेक चुकीचे तर त्यावरही चर्चा
होऊन जाऊ द्या.पण एक आहे न्यायालयाने अगदी दिवाळीच्या तोंडावर असा निर्णय देणे
नैतिक दृष्ट्या अयोग्य आहे याला कारण इतक्या ऐनवेळी फटाके विक्रेत्यांच्या उपजीविकेचे
साधन हिरावून कसे चालेल ?
देवा पुढे दिवा लाऊन हात
जोडावे व मनापासून भगवंताचे नामस्मरण करावे हे जसे शास्त्राच्या पुस्तकात लिहिले
आहे तसाच फटाक्यांचा उल्लेख कुठेही नाही उलट आपल्याकडून कोणाला त्रास होईल अशी
कृती कधीही करू नये असा प्रत्येक धर्म सांगतो पण सरळ वागेल तो माणूस कसला तो करतो
आपल्या सोयीने त्यात बदल ! आपण वंदे मातरम सर्वांनी म्हणावे ह्यासाठी आग्रही आहोत
पण ह्याच भारतमातेप्रती तुमची काही कर्तव्ये आहेत फक्त घोषणा दिल्याने होत नाही सगळे
काही ! तेव्हा पुन्हा एकदा विनंती करतो सणवार आपल्या आयुष्यात नेहमीच आनंद आणत
असतात कधीतरी गरिबांच्या घरात आपल्याकडून एखाद चांगुलपणाच छोटासा रोप लावून बघा त्यावर
त्वरित माणुसकी रुपी फुल बहरतील आणि हो तुम्हाला पाहून त्या लोकांचा देवावरचा
विश्वास अजून दृढ होईल.अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेच्या काही ओळी इथे सार्थ
होतात
“आओ फिर से दिया जलाएँ
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ” !!!