Thursday, March 30, 2023

श्री रामचंद्र

 श्री राम , मर्यादा पुरुषोत्तम राम , सिया वर राम अनेक नाव पण त्याच बरोबर व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा ! 

नुसत प्रेम करायचं नाही तर त्यासाठी धनुष्य सुध्दा मोडण्याची मनगटात ताकद बाळगावी हा संदेश देणारे राम ! आजच्या पिढीला किती लागू होत हे आपल्या ह्या भौतिकता वादाकडे झुकलेल्या जीवनात आपल्या लोकांच्या प्रेमासाठी काय काय करतो आपण हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा.प्रेम तर होणे सोपे पण जबाबदारी समजून ते निभावणे तेव्हढेच कठीण सध्या प्लास्टिक प्रेमाची सवय झालीय लोकांना ! आपल्या हिशोबाने ते वळायला हवं पण प्रेम हे दुहेरी असत त्यात काही अंशी स्वतःला मी पण बाजूला ठेऊन. कुणाच्या तरी आत्म्याशी एकरूप व्हावे लागते.सध्याच्या धकाधकीच्या आणि वेगवान जगात आपण आपल्या जवळच्या लोकांशी साधं नीट संवाद साधत नाही एकरूपता तर राहूच द्या.


कुटुंबवत्सल रामाचा सध्या एकही गुण आपण घेऊ शकतो का ?वडीलांच्या एका वचनाखातर आपल्या संपूर्ण ऐश्वर्य आणि अधिकारावर तुळशीपत्र ठेवणारा राम जितका महत्त्वाचा तितकाच मोठ्या भावाच्या पादुका गादीवर ठेऊन राज्य करणारा भरत देखील महान म्हणावा लागेल.आज बांधावरून भाऊकीमध्ये होणारे वाद आणि त्यातून चक्क एकमेकांच्या जीवावर उठलेली ही मंडळी पाहिली की त्यांना लहानपणी हे रामयाणातले धडे मिळाले नाही का असा प्रश्न पडतो.

बर त्यात आज वैयक्तिक स्वातंत्र्याच वलय बरच वाढल आहे त्यामुळे जोडीदाराच्या आई वडिलांची अडचण होणे साहजिक आहे.त्यात आपल्या साथीदाराने घर सोडण्याचा घेतलेला निर्णय अर्धांगिनी म्हणून पूर्ण  करण्याचा सीतेचा हट्ट कौतुकास्पद आहे.नाहीतर राजेशाही थाटात वाढल्यावर दोन कापडा सकट घराबाहेर पडायला काळीज खूप मोठं असावं लागत.

सर्वसमावेशक वृत्ती प्रभू रामचद्रांच्या कडून घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.केवटाची नाव असो की वानारांची सेना,शबरीची उष्टी बोर का असेना रामाने त्यांचा आनंदाने स्वीकार केला.आजच्या देशातल्या काही घटना ही सर्वसमावेशकता लोप पावल्याचे द्योतक आहेत.स्मित हास्य आणि निर्मळ मनाने लोकांना आपलंसं करता येत हे आपण शिकायला हवं.

रामाच्या हातातला धनुष्य आणि ते रौद्र रूप हे त्यांचं मूळ स्वरूप नाही.कायम हास्य वदनाने परिस्थितीला सामोरं जाणे,आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संघर्ष करणे,आपल्याला माया लावणाऱ्याना जीव लावणे ह्यातच खर जीवनाचं प्रेयस आहे.ते मर्कट असो की कोटी खार प्रत्येकाला आपल्याला काय मिळेल ह्या पेक्षा मी काय करू शकतो याचा विचार मनात येतो हे खऱ्या अर्थाने राम राज्याचं लक्षण आहे आणि हेच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात दिसून येत. मावळमध्ये मोहिमेवर जाण्यासाठी लागणारी स्पर्धा आणि स्वराज्यासाठी असणारी तळमळ ही निःस्वार्थी भावनेतूनच येत.

मग धनुष्य हाती घ्यावा की घेऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो तेव्हा प्रत्येक वेळी धनुष्य घेऊन राम कधी उभा राहिला नाही आधी सागराला हाथ जोडून केलेली विनंती ऐकली नाही तेव्हा रामाने धनुष्यावर बाण चढवला हे ध्यानात राहू द्यावे.आपल्यावर अन्याय झाल्यावर आणि अधर्म झाल्यावर आपण संघर्ष सज्ज व्हावे हा तो संदेश पण मग संकट हे खऱ्या अर्थाने आलेलं असावं कोणी भीती निर्माण करून तयार केलेलं आभासी नसावं.अवघे विश्वची माझे घर म्हणणारे आपण कुठलाही मानवनिर्मित चौकटीत अडकून राहू नये हीच रामायणाची खरी शिकवण आहे.

खरे पाहता प्रभू श्रीराम ही मुळी व्यक्ती नाहीच ते स्थिर आणि संपूर्ण मनाचं प्रतीक आहे आणि धनुष्यबाण हा त्या मनाचा संयम ! मारुती राया म्हणजे ह्या मनाचे धैर्य ,लक्ष्मण म्हणजे विश्वास! ह्या गुणांच्या सहाय्यानेच आपल्याला अडचणींचा सागर पार करता येतो आणि सीता रुपी प्रेमाने पूर्णत्व प्राप्त करता येते. खर राम हे व्यक्तिमत्त्व साकार होत आणि म्हणूनच सियावर रामचन्द्र हे नाव सार्थ ठरते.

तेव्हा रामराज्य हे राष्ट्र पटलावर अमलात आणण्या आधी मन पटलावर आणि वैयक्तिक आयुष्यात अमलात आणायला हवे.शेवटी सुज्ञ व्यक्तितून समाज आणि समाजातून राष्ट्रीय चारित्र्य घडत असतो.

भारत (हिमांशू टेंभेकर)