Saturday, April 8, 2023

लिहीन म्हणतो


अनेक झाल्या करुनी तशा प्रेमावर कविता 

आता नव्या क्रांतीचे, विचार लिहीन म्हणतो


गंजत चाललं आहे आता समाजमन पुन्हा

त्यांना मी विवेकाची, पुकार लिहीन म्हणतो


उघड्या व्यवस्थेची लक्तरे रोज टांगणीला 

समाजमान्य तो,अत्याचार लिहीन म्हणतो 


श्रीमंतास देवळात भेटे भगवंतही त्वरेने

दारिद्र्याशी केलेला, करार लिहीन म्हणतो


सगळे गुंगलेले दिखाऊ दूनियेमध्ये पण

भूवरील प्रत्यक्ष, समाचार लिहीन म्हणतो 


समतेच्या मारुनी गप्पा दुर्लक्षिले शोषिताना

सत्तेपुढे शहाणपण, लाचार लिहीन म्हणतो 


भेद मांडले सारे लिंग,जाती,धर्म नी पंथाचे

पण मी माणुसकीचा,दरबार लिहीन म्हणतो 

  

जोडून हाथ झाले आपल्याच हक्कांसाठी 

त्याच हातांमध्ये मी,तलवार लिहीन म्हणतो


असत्याच्या पुष्पमाला तुम्हास लख लाभो 

अंगी संघर्ष खुणांचा,शृंगार लिहीन म्हणतो  


विविध रंगी झेंड्यांचे संघर्ष होतात येथे  

एकच रक्ताची लाल,धार लिहीन म्हणतो 


नैतिकता लयास गेली,गेली वाहून तत्वे 

सभ्यतेला पडलेले, खिंडार लिहीन म्हणतो


रंजल्या नी गांजल्यांच्या वेदना कळती कुणा

त्यांसाठी शब्द करून,धारधार लिहीन म्हणतो 


थंडावल्या अस्मिता येथे,इमान गहाण गेला

मनाच्या यज्ञातला तप्त,अंगार लिहीन म्हणतो 


अन्याया विरुद्ध बोलणे गुन्हा ठरवेल कोणी 

पुन्हा इन्कलाबाचे, मी उद्गार लिहीन म्हणतो


भारत (हिमांशू)

2 comments: